रामनगरवासीयांना मिळाला मालकी हक्काचा दिलासा; फ्रीहोल्ड प्रमाणपत्रांचे वाटप

Sat 11-Apr-2026,12:37 AM IST -07:00
Beach Activities

रामनगरवासीयांना मिळाला मालकी हक्काचा दिलासा; फ्रीहोल्ड प्रमाणपत्रांचे वाटप

वर्धा,  (प्रतिनिधी – युसूफ पठाण)

वर्धा : वर्धा रामनगर परिसरातील नागरिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भूखंडांच्या नूतनीकरणाचा व मालकी हक्काचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून रामनगरवासीयांना मालकी हक्काचा दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

नगाजी महाराज देवस्थान, वर्धा येथे नगर परिषदेमार्फत रामनगरमधील लीज भूखंड धारकांना फ्रीहोल्ड प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगूळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, मुख्याधिकारी विजय देशमुख, नगरसेवक संतोष ठाकूर, निलेश किटे, राखी पांडे, प्रियंका खंगार आदी मान्यवर उपस्थित होते.

रामनगर परिसरातील भूखंडांची लीज १९३० पासून सुरू होती. लीज कालावधी संपल्यानंतर विविध तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची कमतरता आणि कायदेशीर अडथळ्यांमुळे नागरिकांना मालकी हक्क मिळण्यात अडचणी येत होत्या. या समस्येच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राज्य सरकारने विशेष मंजुरी देत नाममात्र दरात मालकी हक्क देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, असे डॉ. भोयर यांनी सांगितले.

राज्य सरकारने कोणत्याही जाचक अटी न ठेवता रामनगरमधील लीज भूखंड फ्रीहोल्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेसाठी नागरिकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हेच सरकारचे ध्येय असून रामनगरच्या या निर्णयामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी नगर परिषद प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमात नगराध्यक्ष सुधीर पांगूळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर तसेच माजी नगराध्यक्ष संतोष ठाकूर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात फ्रीहोल्ड प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. रामनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.