डिजेवर नाचताना धक्काबुक्की,तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.
बल्लारपूर : तालुक्यातील जुनोना येथील बौद्ध विहारात सुरू असलेल्या रिसेप्शन कार्यक्रमादरम्यान डिजेवर नाचताना झालेल्या धक्काबुक्कीच्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना १० एप्रिल रोजी रात्री उशिरा घडली.
याबाबत विश्वजीत सुकरु लेनगुरे ( ४४), रा. यार्ड क्र. २, जुनोना यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाचा निखील उर्फ निलेश अशोक ठाकरे (वय ३२) हा गावातीलच रिसेप्शन कार्यक्रमासाठी बौद्ध विहार येथे गेला होता. रात्री सुमारे १०.१५ वाजताच्या सुमारास डिजेवर नाचत असताना उद्देश राजाराम नळे रा. बाबुपेठ, चंद्रपूर याच्याशी त्याची धक्काबुक्की झाली.
यावरून दोघांमध्ये वाद होऊन भांडण झाले.
दरम्यान, रागाच्या भरात उद्देश नळे याने हातातील धारदार वस्तूने निखीलच्या उजव्या मांडीवर वार करून त्याला जखमी केले. घटनेनंतर जखमी निखील याला त्याच्या मित्रांच्या मदतीने तात्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीसांनी आरोपी उद्देश नळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल बेझलवार करीत आहेत.