ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांची मुस्लिम कमिटीसोबत बैठक
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर: आगामी २६ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद-उन्नबी सणाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन सुरू करण्यात आले आहे. याच अनुषंगाने २२ ऑगस्ट रोजी बल्लारपूर व विसापूर येथील मुस्लिम कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेण्यात आली.
बल्लारपूर पोलीस ठाण्यात आयोजित या बैठकीस जामा मस्जिद कमिटी बल्लारपूरचे अध्यक्ष उस्मान गुलजार शेख, नगर सेवक इस्माईल ढाकवाला यांच्यासह शहरातील विविध मस्जिद कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या जुलूसच्या मार्गाबाबत, जुलूसमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या संभाव्य संख्येबाबत तसेच आवश्यक सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलिसांनी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
सणाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक व्यवस्था, जुलूसचा मार्ग, गर्दीचे नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत आवश्यक सूचना उपस्थितांना देण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सण उत्साहात आणि शांततेत पार पडावा, यासाठी सर्वांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच सणाच्या कालावधीत कोणतीही अफवा पसरवू नये, संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा विविध सुरक्षाविषयक सूचना देण्यात आल्या.
ईद-ए-मिलादचा सण शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि उत्साहात पार पडावा यासाठी बल्लारपूर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्याकडून करण्यात आले आहे.