अवैध दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलिसांची धडक कारवाई
अवैध दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलिसांची धडक कारवाई
तीन ठिकाणी कारवाई; २ लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
नावेद पठाण, मुख्य संपादक, वर्धा
सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम राबवित तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत एकूण २ लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पहिली कारवाई उमरी-पिपरी मेघे मार्गावरील शाम मोहड यांच्या ढाब्याजवळ करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान यश पाटील व मुकुंदा भिसे हे दुचाकीवरून गावठी मोहा दारूची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून सुझुकी अॅव्हेनिस दुचाकी (एमएच ३२ एयू ३७६६) किंमत १ लाख रुपये आणि ६० लिटर गावठी मोहा दारू किंमत १२ हजार रुपये, असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई वायफड-वर्धा मार्गावरील रोठा बसस्थानकाजवळ करण्यात आली. यावेळी सतीश हिरालाल पवार याच्याकडून हिरो फॅशन प्रो दुचाकी (एमएच ३२ एव्ही ९३३८), ३० लिटर गावठी मोहा दारू आणि दोन कॅन असा एकूण ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसरी कारवाई वायफड-वर्धा मार्गावरील रोठा येथील विद्यादीप सेलिब्रेशन हॉलसमोर करण्यात आली. यावेळी मंगेश संदीप पाटील याच्याकडून नंबर प्लेट नसलेली होंडा सीबी शाईन दुचाकी, ३० लिटर गावठी मोहा दारू आणि जुनी कॉलेज बॅग असा एकूण ८६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या तीनही प्रकरणांत पंचनामा करून एकूण २ लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींविरुद्ध लेखी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी मेघेचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार अभय खोब्रागडे, पोलीस शिपाई शाम सलामे आणि गौरव नरताम यांनी केली.