कर्तव्य बजावताना प्राणार्पण करणाऱ्या वीर पोलिसांना चंद्रपूरमध्ये भावपूर्ण आदरांजली

Fri 23-Oct-2026,08:10 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर: देशाची शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखताना कर्तव्याच्या मार्गावर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर पोलिसांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यासाठी बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर पोलीस मुख्यालयातील हुतात्मा स्मारक मैदानावर पोलीस स्मृतीदिन गांभीर्यपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूर पोलीस जवानांना पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी वसुमना पंत (भा.प्र.से.) उपस्थित होत्या. चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनूरी नरेश (भा.प्र.से.), पोलीस अधीक्षक आयुष नोपानी (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे (म.पो.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

कर्तव्य बजावताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन करत उपस्थितांनी त्यांच्या शौर्याचे आणि त्यागाचे स्मरण केले. यावेळी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना मानवंदना देण्यात आली. या सोहळ्यात शहीद जवानांचे कुटुंबीय विशेषत्वाने उपस्थित होते. जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमात सहायक पोलीस अधीक्षक तथा राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत, मुलचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खैत्रे यांच्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच एसएफपीएफचे अधिकारी आणि जवान सहभागी झाले होते.

यावेळी शांतता समितीचे सदस्य, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस मित्र आणि पत्रकार बांधवही उपस्थित होते. समाजात शांतता, सुरक्षितता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा पोलिसांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या शौर्याचा आणि त्यागाचा आदर्श सदैव प्रेरणा देत राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. हुतात्म्यांना शोकप्रणाम अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.