भारत नागपाल हत्या प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी; वर्ध्यात शांततापूर्ण मोर्चा

Fri 06-Mar-2026,04:00 AM IST -07:00
Beach Activities

भारत नागपाल हत्या प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी; वर्ध्यात शांततापूर्ण मोर्चा

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण

समाजसेवक स्व. भारत नागपाल यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वर्धा शहरात शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक, समाजसेवक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, स्व. भारत नागपाल यांची बांबर्डे रेती घाट परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सीआयडी (क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट) मार्फत करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच या हत्याकांडामागील सूत्रधाराचा शोध घेऊन सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी दोषी व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत जामीन देऊ नये, तसेच त्यांना तातडीने न्यायालयात हजर करून कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका मांडली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी आंदोलकांनी केली.

या संदर्भात आंदोलकांच्या वतीने पोलीस अधीक्षक, वर्धा तसेच जिल्हाधिकारी, वर्धा यांना निवेदन देण्यात आले असून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित सर्व दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.