बिनानंबर ट्रॅक्टर-ट्रॉलीतून अवैध वाळू वाहतूक; चालक फरार, ६.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
बिनानंबर ट्रॅक्टर-ट्रॉलीतून अवैध वाळू वाहतूक; चालक फरार, ६.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा तालुका प्रतिनिधी इरशाद शहा
सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांडली–सिंदी रेल्वे मार्गावर अवैध वाळू वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता कांडली येथून सिंदी रेल्वेकडे जाणाऱ्या बिनानंबरच्या लाल रंगाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला पोलिसांनी संशयावरून अडवले.
तपासणीदरम्यान चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत केलेल्या तपासणीत ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये अवैधरित्या काळी वाळू भरलेली आढळून आली.
या कारवाईत अंदाजे १ ब्रास वाळू (सुमारे ६,००० रुपये), ट्रॅक्टर (सुमारे ५ लाख रुपये) आणि ट्रॉली (सुमारे १ लाख रुपये) असा एकूण ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चालक अमोल गोविंदराव डोंबकाले (वय ३२, रा. कांडली, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाहनमालक महादेव वांखेडे यांचाही प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.
ही कारवाई पो.हे.का. प्रफुल्ल दामोदरराव गजभिये (पोलीस ठाणे सिंदी रेल्वे) यांच्या नेतृत्वात पार पडली. पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.