रामनगर पोलिसांची मोठी कामगिरी : दिवसाढवळ्या घरफोडीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ६.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
रामनगर पोलिसांची मोठी कामगिरी : दिवसाढवळ्या घरफोडीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ६.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा
वर्धा | ४ मे २०२६ रामनगर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ६ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी हेमलता गजानन वाडकर (वय ४६, रा. अग्निहोत्री कॉलेजजवळ, रामनगर, वर्धा) यांनी तक्रार दिली होती. त्यांचे पती सीआयएसएफमध्ये कार्यरत असून सध्या भिलाई येथे पदस्थ आहेत. दि. १७ एप्रिल २०२६ रोजी त्या केदारनाथ दर्शनासाठी घर बंद करून गेल्या होत्या.
दि. ३० एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता परत आल्यानंतर घराच्या मागील दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसून आले तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत होते. कपाटाची तपासणी केली असता चांदीचे पैंजण, जोडवे व रोख ३० हजार रुपये असा एकूण ४० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनाचा माग काढत प्रसन्न प्रमोद मेश्राम व साहिल उत्तमराव घरत या दोघांना अटक केली. चौकशीत दोघांनीही चोरीची कबुली दिली.
आरोपींकडून कार, मोबाईल फोन, रोख रक्कम व चांदीचे दागिने असा एकूण ६,२९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांच्या नेतृत्वात पार पडली.
या कारवाईत गजानन इवनाथे, योगेश चन्ने, अजहर खान, राहुल भोयर, रूपेश उगेमुगे व सचिन पवार यांनी सहभाग घेतला.
पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.