वर्धा शहर पोलिसांची कारवाई; अवैध विदेशी दारू वाहतूक करणारा आरोपी जेरबंद
वर्धा शहर पोलिसांची कारवाई; अवैध विदेशी दारू वाहतूक करणारा आरोपी जेरबंद
₹७७ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा
वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान महत्त्वाची कारवाई करत अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत दारू, बिअरचे बॉक्स व मोपेड असा एकूण ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी सायंकाळी वर्धा शहर गुन्हे शोध पथक डाकघर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना एका व्यक्तीकडून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रॅक्टर कंपनी, चितोडा रोड परिसरात सापळा रचून कारवाई केली.
यावेळी पोलिसांनी सुझुकी मोपेड क्रमांक MH 32 B 6284 थांबवून तपासणी केली. वाहन चालकाची ओळख सुनील मोरे (वय २०, रा. पुलफैल, वर्धा) अशी पटली. तपासणीदरम्यान आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसताना विदेशी दारू व बिअरचे बॉक्स आढळून आले.
पोलिसांनी आरोपीकडून विदेशी दारू, बिअरचे बॉक्स तसेच मोपेड असा एकूण ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक संतोष ताले तसेच डाकघर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाई यशस्वी करण्यासाठी विवेक बन्सोड, महेंद्र पाटील, प्रशांत वंजारी व गुन्हे शोध पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.