अल्लीपूर पोलिसांची धडक कारवाई : अवैध वाळू वाहतुकीवर आळा

Fri 22-May-2026,06:33 AM IST -07:00
Beach Activities

अल्लीपूर पोलिसांची धडक कारवाई : अवैध वाळू वाहतुकीवर आळा

२ ट्रॅक्टर-ट्रॉलींसह १४ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

 प्रतिनिधी : सुनील हिंगे, अल्लीपूर

अल्लीपूर : अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत २ ट्रॅक्टर-ट्रॉलींसह एकूण १४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई साती ते खानगाव मार्गावर करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर या पोलीस कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना त्यांना अवैध वाळू वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी ठाणेदार विजयकुमार घुले यांना पथकासह घटनास्थळी पाचारण केले.

ठाणेदार विजयकुमार घुले यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान आरोपींच्या ताब्यातील २ ट्रॅक्टर-ट्रॉली आढळून आल्या. प्रत्येक ट्रॉलीमध्ये एक ब्रासप्रमाणे एकूण २ ब्रास काळी रेती विनापास व विनापरवाना अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांच्या ताब्यातून १४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले (पुलगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजयकुमार घुले, उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर, जमादार अजय रिठे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अल्लीपूर पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून, अशा बेकायदेशीर प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.