अपघातग्रस्त युवकाला वेळेत मदत; अल्लीपूर शंकर पट व्यवस्थापन समितीची रुग्णसेवा ठरली जीवनदायी

Sat 30-May-2026,04:48 AM IST -07:00
Beach Activities

अपघातग्रस्त युवकाला वेळेत मदत; अल्लीपूर शंकर पट व्यवस्थापन समितीची रुग्णसेवा ठरली जीवनदायी

अल्लीपूर | प्रतिनिधी सुनील हिंगे

हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव फाटा येथे 29 मे 2026 रोजी झालेल्या अपघातात जखमी झालेल्या युवकाला अल्लीपूर शंकर पट व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्पर मदत करून त्याचे प्राण वाचविल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर जखमी युवक रस्त्याच्या कडेला गंभीर अवस्थेत पडून होता. मात्र, त्याला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. त्यावेळी अल्लीपूर येथील शंकर पट समितीचे सदस्य संजय लिचडे या मार्गाने जात असताना त्यांना अपघातग्रस्त युवक दिसला. त्यांनी तत्काळ रुग्णमित्र तथा समितीचे उपाध्यक्ष गोपाल मेघरे यांना याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच गोपाल मेघरे यांनी कोणताही विलंब न करता समितीची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. जखमी युवकाला तातडीने उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी युवकाचे नाव गजेंद्र अष्टेकर (रा. केळापूर, जि. यवतमाळ) असे असल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे, रुग्णासोबत जाण्यास कोणीही तयार नसताना गोपाल मेघरे यांनी रुग्णवाहिका चालक राजू खामनकर व अंकुश भोसकर यांच्या सहकार्याने युवकाला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवून उपचाराची व्यवस्था केली.

या सामाजिक व मानवतावादी कार्यामुळे जखमी युवकाचे प्राण वाचल्याने परिसरात समितीच्या कार्याचे कौतुक होत आहे. "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" या उक्तीचा प्रत्यय या घटनेतून आला.