सेवा हनुमान मंदिरात धाडसी चोरी; चांदीचे दागिने व दानपेटीतील रोकड लंपास
सेवा हनुमान मंदिरात धाडसी चोरी; चांदीचे दागिने व दानपेटीतील रोकड लंपास
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
आंजी मोठीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील सेवा हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून धार्मिक भावना दुखावणारी घटना घडविली आहे. चोरट्यांनी मंदिरातील चांदीचे धार्मिक अलंकार तसेच दानपेटीतील रोकड लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० जूनच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी हनुमानजींच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट, चांदीचे छत्र तसेच चांदीची हनुमान मूर्ती चोरून नेली. त्यानंतर मंदिरातील दानपेटी बाहेर नेऊन फोडण्यात आली व त्यातील रोकड घेऊन चोरटे पसार झाले.
या चोरीमध्ये चांदीचे साहित्य आणि रोख रक्कम मिळून अंदाजे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासासाठी वर्धा येथून श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने शेतांच्या दिशेने शोधमोहीम राबविली.
धार्मिक स्थळी झालेल्या या चोरीमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खरांगणा पोलीस करीत आहेत.