अभंगांच्या सुरांनी वसमत भारावली; कृष्णा बोंगाणे यांच्या मैफिलीला रसिकांची उत्स्फूर्त दाद

Tue 28-Jul-2026,06:45 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :-अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली :-वसमत येथे स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसेवा सप्ताह अंतर्गत आषाढी एकादशीचे औचित्य साधून वसमत येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंगवाणी’ या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमदार राजूभैया नवघरे यांच्या प्रेरणेतून सुरमणी प्रा. दत्ता चौगुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक कृष्णा श्रीमंतराव बोंगाणे यांनी आपल्या सुरेल अभंग, भक्तिगीते आणि शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणाने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

उस्ताद रशीद खान यांचे शिष्य असलेल्या कृष्णा बोंगाणे यांनी भावपूर्ण गायकीतून संतपरंपरेतील अभंगांना सुरांची अनोखी उंची दिली. त्यांच्या प्रभावी आवाजातील भक्तिरसाने संपूर्ण सभागृह भारावून गेले. प्रत्येक सादरीकरणानंतर उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले.

या संगीत मैफिलीत तबल्यावर कुलकर्णी सरदवे, हार्मोनियमवर मंगेश जावळेकर, व्हायोलिनवर पंकज शिरसाठे, पखवाजवर विश्वेश्वर कोळंबीकर तसेच देशमुख यांनी उत्कृष्ट साथसंगत करत कार्यक्रमाची रंगत अधिक खुलवली. सर्व कलाकारांच्या सुरेल सादरीकरणामुळे भक्ती, शास्त्रीय संगीत आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

जनसेवा सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची मालिका राबविण्यात येत असून, त्यामधील हा अभंगवाणीचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. वसमतच्या सांस्कृतिक इतिहासात अशा प्रकारचा दर्जेदार अभंगवाणीचा कार्यक्रम प्रथमच मोठ्या प्रमाणावर आयोजित झाल्याची भावना अनेक रसिकांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती, नगरसेवक शेख हबीब शेख बशीर, गटनेते सचिन दगडू, नगरसेवक राजकुमार एंगडे, धनंजय गोरे, राजुभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.