पत्ता विचारण्याचा बहाण्याने ५५ हजारांची रोकड हिसकावून चोर फरार

Mon 03-Aug-2026,07:01 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर :चंद्रपूर आईच्या उपचारासाठी सोन्याची अंगठी विकून मिळालेली ५५ हजारांची रक्कम अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना २९ जुलै रोजी दादमहल वॉर्ड परिसरात घडली. या प्रकरणी पीडिताने ३० जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, होकम चौक, दादमहल वॉर्ड येथील रहिवासी लंकेश मधुकर पाटील ५० वर्षे हे सराफा लाईन येथील कोठारी ज्वेलर्समध्ये मजुरीचे काम करतात. त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी २९ जुलै रोजी सुमारे ४.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी मित्र राजकुमार बंगाली यांच्या सराफा दुकानात ५५ हजार रुपयांना विकली.

मिळालेली रक्कम त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून पँटच्या खिशात ठेवली होती.

त्यानंतर दुपारी सुमारे ४ वाजता दादमहल वॉर्ड परिसरातून घरी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना थांबविले. संभाषण सुरू असतानाच त्या व्यक्तीने अचानक त्यांच्या खिशातील ५५ हजारांची रक्कम असलेली प्लास्टिकची पिशवी हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.फिर्यादीने आरोपीचा पाठलाग केला, मात्र तो हाती लागला नाही.

आरोपीचे वर्णन काळा टी-शर्ट, काळ्या-पांढऱ्या रंगाचा हाफ लोअर, सावळा वर्ण, सडपातळ बांधा, वाढलेली दाढी आणि अंदाजे ५ फूट ५ इंच उंची असे असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोषकुमार कनकम करीत आहेत.