मयुरी सुपारे आत्महत्या प्रकरणाला नवे वळण गर्भपात प्रकरणात दोघांना अटक,डॉक्टराचा शोध सुरू

Sat 08-Aug-2026,12:53 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरा-वडगाव परिसरात २ ऑगस्ट रोजी घडलेल्या मयुरी हरिदास सुपारे यांच्या आत्महत्या प्रकरणाला पुन्हा नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू ठेवत शेगाव पोलिसांनी गर्भपाताशी संबंधित गुन्ह्यात आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम ८९ ची भर घातली असून, मृत महिलेच्या पतीच्या काका व काकू यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप असलेले डॉ. विश्वास हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणेकडून मिळाली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर येत असल्याची चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वडील व भाऊ यांनी जून महिन्यात मयुरी जिवंत असताना समुद्रपूर तालुक्यातील गिरड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची तक्रार नोंदवून न घेता त्यांना परत पाठविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या आरोपांमुळे गिरड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, वेळेत आवश्यक कारवाई झाली असती तर मयुरी आणि तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचू शकला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

या संपूर्ण प्रकरणाचा शेगाव पोलीस अधिक तपास करीत असून, फरार आरोपी डॉक्टराचा शोध सुरू आहे. तसेच गिरड पोलिसांविषयी करण्यात आलेल्या आरोपांबाबतही पुढील चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.