चंद्रपूर-मुल मार्ग वलनीजवळ ट्रकची कारला भीषण धडक,महिला पोलीस अंमलदार जागीच ठार
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनीजवळ आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ट्रकने कारला समोरून दिलेल्या जोरदार धडकेत महिला पोलीस अंमलदार विशाखा बनसोड (३२) यांचा जागीच मृत्यू झाला. त्या तळोधी (बा.) पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. विशाखा बनसोड या आज सकाळी आपल्या मारुती स्विफ्ट कार क्रमांक एमएच ३४ बीआर २५६८ ने चंद्रपूर पोलीस मुख्यालय येथे आयोजित उजळणी वर्गासाठी जात होत्या. दरम्यान, चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनीजवळ समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक सीजी ०४ पीजे ९६१५ ने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.
या अपघातात विशाखा बनसोड यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविला.
विशाखा बनसोड यांच्या आकस्मिक निधनाने पोलीस विभागात शोककळा पसरली असून, सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पती आणि तीन वर्षांची मुलगी तसेच आप्त परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघाताची नोंद करून रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.