पशुवैद्यकीय चिकित्सालय अल्लीपूर येथे वंध्यत्व निवारण शिबीर
तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लीपूर
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथे विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा - 2 अंतर्गत दिनांक 21/08/2026 रोजी पशुवैद्यकीय चिकित्सालयात सकाळच्या सत्रात वंध्यत्व निवारण शिबीर आयोजित करण्यात आले. सदर शिबि रामध्ये डॉ. सुरेंद्र पराते, जिल्हा प्रकल्प अधिकारी आणि इंदूजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनीचे डॉ. बाबुराव कल्याणकर यांच्या चमू मार्फत गावातील पशुपालकांकडील गाई-म्हशींची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. वंध्यत्व निवारण शिबीरानंतर दुपारच्या सत्रात श्री गजानन महाराज मंदिर येथे शेतकरी पशुपालक यांचे आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठीचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सहभागी दुग्ध व्यावसायिक यांनी या चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यक्रमास चांगला प्रतिसाद देऊन VMDDP प्रकल्प अंतर्गत विविध योजनांची माहिती डॉ. सुरेंद्र पराते यांचेकडून सविस्तरपणे जाणून घेतली. फायदेशीर दुग्ध व्यवसाय कसा करावा याबाबत डॉ. बाबुराव कल्याणकर यांनी मार्गदर्शन केले, तसेच डॉ. प्रशांत वरभे, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी आगामी काळात सुरू होणार्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. सहभागी शेतकरी पशुपालक यांनी वंध्यत्व निवारण शिबीर व प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले व कार्यक्रम नियोजनकर्ते इंदूजा महिला मिल्क प्रोड्यूसर कंपनीकडील फील्ड फेसिलीटेटर श्री. ऋषिकेश जावरकर व कु. रजनी ताजणे यांचे आभार मानले.