जि.प.उर्दू प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Tue 08-Sep-2026,04:33 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली : वसमत शहरातील स्थानिक जिल्हा परिषद प्रशाला (उर्दू), वसमत येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शेख राशेदा बेगम अब्दुल रशीद होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी योगेश पाटील, विषयतज्ज्ञ डी.ए. वाळवंटे आणि आंबा केंद्राचे विशेष शिक्षक राहुल सोनकांबळे उपस्थित होते.

 

यावेळी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी उर्दू, मराठी व इंग्रजी भाषेतून शिक्षकांप्रती आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रभावी मनोगतांनी उपस्थितांची मने जिंकली.

एस.एस.सी. परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसह मेडल, ट्रॉफी, प्रमाणपत्र, शाल, पुष्पगुच्छ व पेन देऊन गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक कु. सना अंजूम जमील शेख, द्वितीय क्रमांक कु. शिफा माहिरीन अब्दुल खय्युम, तर तृतीय क्रमांक कु. आयशा तय्यब शेख यांनी मिळविला. तसेच ९४ टक्के गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल कु. सय्यदा हाजरा तहेसीन सय्यद अब्दुल्लाह साबेर हिचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

‘केवळ फोटोंपुरते काम नको, गुणवत्तेवर भर द्या’

 

गटशिक्षणाधिकारी योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना कठोर परिश्रम करून MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे आणि अधिकारी बनून समाजाला व नवीन पिढीला दिशा द्यावी, असे आवाहन केले.

 

शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्यांनी कोणताही उपक्रम केवळ फोटोंपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती १०० टक्के कशी राहील आणि शिक्षणाचा दर्जा कसा उंचावेल, यावर भर देण्याचे सांगितले. नवोदय, शिष्यवृत्ती व NMMS यांसारख्या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी नियोजनबद्ध पद्धतीने करून घेतल्यास दहावीच्या निकालाचा आलेख भविष्यातही उंचावत राहील, असे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनवर खान खादर खान यांनी केले, तर सय्यद अब्दुल्लाह साबेर यांनी सह-सूत्रसंचालक म्हणून साथ दिली. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पठाण अतिया हिना बाजी, शेख अस्मा बाजी आणि शिक्षकेतर कर्मचारी सुरेश तुळशीराम हंबर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शेख शाहेद खाजा मिया, कौसर बाजी, सय्यद जहीर, अब्दुल रहीम चाचा, शेख माजीद अब्दुल, शेख मुनव्वर यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.

शेवटी अनवर खान सर यांनी उपस्थितांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.