बल्लारपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार यांची वाशिम येथे सहायक आयुक्तपदी नियुक्ती

Tue 22-Sep-2026,11:44 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या समाज कल्याण व तत्सम गट-अ संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने २२ सप्टेंबर २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात बल्लारपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार यांना वाशिम येथे सहायक आयुक्त, समाज कल्याण पदावर नियुक्ती आदेश देण्यात आला

मंत्रालयाच्या परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध गट-अ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना यावेळी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

रविंद्र भंडारवार यांनी बल्लारपूर नगर परिषदेत उपमुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना प्रशासकीय कामकाज, नागरी सुविधा तसेच शाळा सुधार योजना आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत योगदान दिले. आता त्यांची वाशिम येथे सहायक आयुक्त, समाज कल्याण या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने बल्लारपूर नगर परिषदेसह शहरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून झालेल्या निवडीमुळे भंडारवार यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला नवी जबाबदारी मिळाली असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल व गरजू घटकांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. २२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीतील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात हा गौरव सोहळा पार पडला. नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर रविंद्र भंडारवार यांचे सहकारी, मित्रपरिवार आणि बल्लारपूर शहरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.