अखेर ‘त्या’ १७५ चौ.मी.तथाकथित जागेवरील टिनशेडवर नगरपरिषदेचा हातोडा!
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली :वसमत नगरपरिषदेच्या मालकीच्या १७५ चौ.मी. जागेबाबत सुरू असलेल्या वादाला अखेर कारवाईचे वळण मिळाले आहे. मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांच्या पुढाकारातून नगरपरिषद प्रशासनाने आज, ३० सप्टेंबर २०२६ रोजी,सदर जागेवरील टिनशेड हटविण्यात आले आहे
या पूर्वी १६ सप्टेंबर रोजी अतिक्रमणधारकास जागा तात्काळ स्वतःहून रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, मुदतीत अतिक्रमण न हटविल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली. नगरपरिषदेच्या मालकीची भाडेतत्त्वावरील जागा रिकामी करून ताब्यात देण्याचे आदेश यापूर्वीही देण्यात आले होते.
दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी नगरपरिषदेच्या १९ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्याकडे निवेदन देऊन अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी नगरपरिषदेचे व्यापारी संकुल उभारून दुकानांचा लिलाव करण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन दिवसांतच कारवाई करत बुधवारी सकाळी मुख्याधिकारी यांनी फौज फाट्यासह सदर जागेवर पोहोचून अतिक्रमण काढून घेतले आहे.
यानंतर मोकळ्या झालेल्या जागेवर नगरपालिकेचे अग्निशमन दल ट्रॅक्टर आदी वाहने पार्क केली आहे.
नगर परिषदेच्या या कारवाईकडे शहरवासी यांचे लक्ष लागले होते . एकंदरीत चित्र पाहता नगरपरिषद प्रशासनाने आणखीही काही जागा मालकांना अतिक्रमण काढण्याचे नोटीस दिलेले आहे त्यांच्यावर केव्हा नगरपरिषदेचा हातोडा पडेल असा सवाल वसमतकरातून होत आहे.