दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करा; खासदार अमर काळे यांची मागणी
दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करा; खासदार अमर काळे यांची मागणी
मासिक पेन्शन ५ ते ६ हजार रुपये करण्यासाठी शासनाला पत्र; घरकुल, शिक्षण, आरोग्य व स्वयंरोजगाराच्या सुविधांचीही मागणी
प्रतिनिधि मलिक पटेल आर्वी
वर्धा : राज्यातील दिव्यांग बांधवांना सन्मानाने आणि स्वावलंबीपणे जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करून ती ५ ते ६ हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे यांना १४ नोव्हेंबर २०२६ रोजी लेखी पत्र दिले आहे.
वाढत्या महागाईच्या तुलनेत दिव्यांग बांधवांना मिळणारे सध्याचे मासिक आर्थिक सहाय्य अपुरे ठरत आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी मासिक पेन्शनमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याचे खासदार काळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
केवळ पेन्शनवाढ न करता दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने ठोस धोरण राबवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दिव्यांगांना घरकुल, शिक्षण, आरोग्य सुविधा तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सुचविले आहे.
दिव्यांग बांधवांना केवळ सहानुभूती नको, तर सन्मानाने जगण्यासाठी समान संधी आणि भक्कम आर्थिक आधार मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या समस्या आणि मागण्यांचा गांभीर्याने विचार करून पेन्शनवाढीसह आवश्यक सुविधांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली आहे.
दिव्यांग बांधवांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न खासदार काळे यांनी शासनदरबारी मांडल्याने त्यांच्या या पुढाकाराचे दिव्यांग बांधवांकडून स्वागत करण्यात येत असून, मागण्यांबाबत शासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रश्नांना मंत्रालय स्तरापर्यंत पोहोचविल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी खासदार अमर काळे यांचे आभार व्यक्त केले आहेत.