आर्वी-तळेगाव आगारातील प्रवासी निवाऱ्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर
आर्वी-तळेगाव आगारातील प्रवासी निवाऱ्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर
आमदार सुमित वानखेडे यांच्या पाठपुराव्याला यश; ७५ अद्ययावत प्रवासी निवारे उभारण्यास शासनाची मंजुरी**
प्रतिनिधि मलिक पटेल आर्वी
आर्वी : जनतेच्या मागणीनुसार विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागांतर्गत ७५ अद्ययावत प्रवासी मार्ग निवाऱ्यांच्या उभारणीसाठी १५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. यामुळे आर्वी व तळेगाव आगारांतर्गत येणाऱ्या विविध गावांतील प्रवासी निवाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
अनेक ठिकाणी प्रवासी निवाऱ्यांची सुविधा नसल्याने प्रवाशांना उन्हाळ्यात कडक उन्हात, पावसाळ्यात पावसात तर हिवाळ्यात थंडीत उघड्यावर उभे राहून एसटी बसची प्रतीक्षा करावी लागत होती. याचा सर्वाधिक त्रास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत होता. आता शासनाच्या मंजुरीमुळे या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नियोजित निवाऱ्यांचा आकार ३० फूट बाय ८ फूट असून, आवश्यक तांत्रिक निकषांनुसार ही कामे करण्यात येणार आहेत.
आर्वी आगारांतर्गत वर्ध मनेरी, विरूळ (आकाजी), रोहणा, आर्वी तहसील कार्यालयाजवळ (आर्वी-तळेगाव मार्ग), आर्वी-पुलगाव नगरपरिषदजवळ, माऊंट कॉन्व्हेंटजवळ (आर्वी-वर्धा मार्ग), सोरटा, पावडे नर्सिंग होम, सुसुंद, डबलीपूर, चोपण, धनोडी, पाचोड, विरूळ फाटा स्टेशन, गव्हाणखेडी, सहेली, हिवरातांडा, विरूळ, भादोड, पानवाडी, बेलारा आणि हर्राशी अशा २२ ठिकाणांचा समावेश आहे.
तसेच तळेगाव आगारांतर्गत परसोडा, वाघोली, भारसवाडा, तारासावंगा, बांगडापूर, पार्दुणा फाटा, रानवाडी, दलपतपूर, मोई, काकडधरा, वडाळा, वर्धपूर यांसह कारंजा तालुक्यातील प्रस्तावित गावांचाही समावेश करण्यात आला आहे.
प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सुमित वानखेडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या निर्णयामुळे आर्वी विधानसभा क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवासी निवाऱ्यांची कामे लवकर सुरू व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.