वाढदिवस असावा तर असा! कागबन येथील युवा कार्यकर्ते साईनाथ कोल्हे यांचा प्रेरणादायी उपक्रम.
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत तालुक्यातील कागबन येथे जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम साजरा.
सध्याच्या काळात वाढदिवस हा अनेकदा महागड्या पार्ट्या, बॅनर्स आणि दिखाव्यावर खर्च करून साजरा केला जातो. मात्र, याला छेद देत वसमत तालुक्यातील कागबन येथील युवा कार्यकर्ते साईनाथ कोल्हे यांनी आपला वाढदिवस अत्यंत प्रेरणादायी आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा केला आहे. वाढदिवसाचा खर्च टाळून त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोरगरिब व गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करत अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
जि.प. प्राथमिक शाळा, कागबन येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्रेहमय कार्यक्रमात अंगणवाडीपासून ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता. साईनाथ कोल्हे यांनी स्वतः शाळेत उपस्थित राहून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हातात वह्या, पेन, पेन्सील, कंपास बॉक्स यांसारखे शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप केले. हसत्यामुखांनी आणि उत्साहात मिळालेले हे साहित्य पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद व समाधान पाहायला मिळाले.
शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा मूळ उद्देश
ग्रामीण भागातील आणि विशेषतः गोरगरिब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी आणि शिक्षणाची वाट अधिक सुकर व्हावी, हा या विधायक उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे साईनाथ कोल्हे यांनी सांगितले. लहान वयातच मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्यास त्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रेरणा मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युवा पिढीसाठी एक आदर्श संदेश
आजची युवा पिढी वाढदिवसासारखे आनंदाचे प्रसंग साजरे करताना अनेकदा अनावश्यक खर्चाकडे वळते. मात्र, अशा प्रकारच्या उपक्रमांतून 'समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो' ही जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असा मोलाचा संदेश साईनाथ कोल्हे यांनी या माध्यमातून दिला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, गावकऱ्यांसह विविध स्तरांतून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.