२८८ आमदारांची प्रतीकात्मक तिरडी काढून सकल मराठा समाजाचे आंदोलन

Thu 03-Sep-2026,08:19 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले, हिंगोली 

हिंगोली : वसमत येथे आज सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसह मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वसमत येथे गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी २८८ आमदारांची प्रतीकात्मक तिरडी तयार करून शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

या आंदोलनात वसमत शहरासह ग्रामीण भागातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाची सांगता उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली.

उपोषण सोडण्याची विनंती; वाघमारे ठाम

दरम्यान, सकल मराठा समाजाच्या मागण्या आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत रविकिरण वाघमारे हे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. आज समाजबांधवांच्या वतीने त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली.

“मी उपोषण सोडणार नाही; मात्र आजपासून पाणी पिण्यास सुरुवात करतो,” अशी भूमिका रविकिरण वाघमारे यांनी यावेळी स्पष्ट केली. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवत त्यांनी पाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलनादरम्यान सकल मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भावना उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे,पोलीस निरीक्षक वसमत शहर सुधीर वाघ सह पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते