कारंजात १३२ वाहनचालकांवर कारवाई; २.१७ लाखांचा दंड

Sun 11-Oct-2026,10:40 PM IST -07:00
Beach Activities

कारंजात १३२ वाहनचालकांवर कारवाई; २.१७ लाखांचा दंड

जीवन सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक पोलिसांची धडक मोहीम

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

कारंजा (घाडगे) : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व अपघातांना आळा घालण्यासाठी जीवन सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३२ वाहनचालकांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २ लाख १७ हजार ६५० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

१० ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले, ठाणेदार प्रल्हाद मदन, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी विजयकुमार घुले, पोलीस उपनिरीक्षक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक मदनकार तसेच वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

शहरातील रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने, तीन आसनी प्रवास, वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविणे तसेच अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ अंतर्गत कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसह संबंधित वाहनमालकांवरही कारवाई करण्यात आली.

वाहनचालकांनी रस्त्याच्या मधोमध, चौकात, वळणावर, बसथांब्याजवळ किंवा गर्दीच्या ठिकाणी अनधिकृतपणे वाहने उभी करू नयेत. रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच निर्धारित वाहनतळांचाच वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वाहतूक नियमांबाबत जनजागृती करून अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जीवन सुरक्षा अभियान संपूर्ण वर्धा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.