राजुरा-बल्लारपूर मार्गावर ट्रकच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Tue 13-Oct-2026,09:03 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : राजुरा ते बल्लारपूर मार्गावरील पुलाजवळ आज सायंकाळच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात आवाळपूर, ता. कोरपना येथील २४ वर्षीय आदर्श कैलास राठोड याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी युवकाला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे साइडिंगवर लोहखनिज खाली करून परत येणारा ट्रक क्रमांक एमएच ३३ टी ३९५२ राजुरा-बल्लारपूर मार्गाने जात होता. दरम्यान, पुलाजवळ ट्रकची दुचाकी क्रमांक एमएच ३४ एटी ८३१४ ला जोरदार धडक बसली.

या धडकेत दुचाकीस्वार आदर्श कैलास राठोड गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविले; मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.

या अपघातामुळे राजुरा-बल्लारपूर मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. अपघाताच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अवघ्या २४ वर्षांच्या आदर्शच्या मृत्यूमुळे आवाळपूर येथे शोककळा पसरली आहे.

या अपघाताची नोंद घेऊन राजुरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.