अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण उघड; आरोपीला अटक, मुलगी सुखरूप पालकांच्या ताब्यात

Sat 28-Feb-2026,12:09 PM IST -07:00
Beach Activities

अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण उघड; आरोपीला अटक, मुलगी सुखरूप पालकांच्या ताब्यात

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी – युसुफ पठाण

देवळी येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेत अटक केली असून पीडित मुलीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे.

याबाबत फिर्यादीने पोलीस स्टेशन देवळी येथे तोंडी तक्रार दिली की, त्यांच्या अंदाजे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले आहे. सदर तक्रारीवरून दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी अप. क्र. ८००/२०२५ अन्वये कलम १३७(२) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.

या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या विशेष सूचना व निर्देशानुसार करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

तपासादरम्यान खात्रीशीर मुखबिर व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी व पीडित मुलगी शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथून रेल्वेने वर्धेकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वर्धा रेल्वे स्थानकावर सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी समीर कैलास बावणे (वय २४ वर्षे, रा. देवळी) यास अटक करण्यात आली असून पीडित १७ वर्षीय मुलीस सुखरूप शोधून तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन देवळी करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद चौधरी (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात स. फौ. सुभाष राऊत, दिवाकर परिमल, खुशालपंत राठोड, नितेश मेश्राम, म. पो. हवा. अलका कुंभलवार, पो. शि. नवनाथ मुंडे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व सायबर सेलचे अक्षय राऊत व गोविंद मुंडे यांचा सहभाग होता.