पुलगावमध्ये कँडल मार्च; महिलांचा मोठा सहभाग दिवंगत भारत नागपाल यांना श्रद्धांजली, आरोपींना कठोर शिक्षेची मागणी

Mon 09-Mar-2026,10:44 PM IST -07:00
Beach Activities

पुलगावमध्ये कँडल मार्च; महिलांचा मोठा सहभाग, दिवंगत भारत नागपाल यांना श्रद्धांजली, आरोपींना कठोर शिक्षेची मागणी

पुलगाव | वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण

वरोरा-हिंगणघाट सीमेवरील बामरडा रेती घाट येथे झालेल्या भाजपचे पुलगाव-देवळीचे महामंत्री व तरुण व्यावसायिक भारत नागपाल यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुलगाव शहरात कँडल मार्च काढण्यात आला. या मूक कँडल मार्चमध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग असून हजारो नागरिकांनी हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन दिवंगत भारत नागपाल यांना श्रद्धांजली अर्पण केली.

होळीच्या पूर्वसंध्येला वरोरा व हिंगणघाट सीमेवरील बामरडा रेती घाटावर काही आरोपींनी भारत नागपाल यांना बोलावून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने मार्ग बंद करून सुमारे १५ ते २० जणांच्या टोळीने त्यांना घेरून निर्घृण मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नदीच्या खोल पात्रात फेकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील व्यापारी, सामाजिक संघटना, महिला, तसेच विविध राजकीय पक्षांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोर्चे व कँडल मार्च काढून आरोपींना कठोर शिक्षा व फाशीची मागणी केली जात आहे.

पुलगाव येथे नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून सर्वपक्षीय, विविध सामाजिक संघटना व महिला मंडळांच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला. या मूक मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या. हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन नागरिकांनी आरोपींविरुद्ध सीआयडी चौकशीची मागणी करत कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी पोलिस उपअधीक्षकांना निवेदनही देण्यात आले.

दरम्यान, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा हा गृह जिल्हा असताना एवढी गंभीर घटना घडूनही अद्याप सीआयडी चौकशीची घोषणा न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आमदार राजेश बकाने यांनीही विधानसभा अधिवेशनात या प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले.

कँडल मार्चमध्ये सहभागी नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सीआयडी चौकशी जाहीर करावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे.