महिलादिनी कु. जानवी भस्मे हिचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Mon 09-Mar-2026,10:54 PM IST -07:00
Beach Activities

महिलादिनी कु. जानवी भस्मे हिचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

कारंजा येथील मॉडेल हायस्कूलची विद्यार्थिनी कु. जानवी राजेंद्र भस्मे हिचा जागतिक महिला दिनानिमित्त गौरव करण्यात आला. चरखा गृह येथे महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित पालकमंत्री नारी शक्ती सन्मान सोहळा तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कला व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते तिचा शील्ड व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मागील महिन्यात पंचायत समिती, कारंजा येथे आयोजित आकांक्षी तालुका कार्यक्रमात कु. जानवी भस्मे हिच्या सुमधुर गायनाने पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन हे प्रभावित झाले होते. त्यानंतर तिला जिल्हा परिषदेद्वारे आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात गायन सादर करण्याची संधी देण्यात आली. जिल्हास्तरीय कार्यक्रमांमध्येही तिच्या गोड कंठातील सुमधुर गायनाने उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.

कारंजा सारख्या ग्रामीण भागातून पुढे येत मॉडेल हायस्कूलच्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या कु. जानवी भस्मे हिच्या अंगी असलेल्या उत्कृष्ट गायनकलेची दखल घेऊन तिला प्रोत्साहन देण्यासाठी महिला दिनाच्या निमित्ताने हा विशेष सन्मान देण्यात आला.

या प्रसंगी भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ॲड. शोभाताई काळे, सचिव संदीप भाऊ काळे, कारंजा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी वीणा धावडे, मॉडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद कहारे, संगीत शिक्षक पंकज जळीत तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. जानवीचे अभिनंदन केले.