सालोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न
सालोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न
नागरिकांच्या महसुली प्रश्नांना दिलासा
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
नागरिकांना शासकीय कार्यालयातील विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत सालोड (हि.) येथे महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर १४ मार्च रोजी श्री सदानंद महाराज मठ, सालोड येथे यशस्वीरित्या पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी दीपक करंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रफुल्ल चौधरी, तहसीलदार संदीप पुंडेकर, नायब तहसीलदार उदय धर्माधिकारी, नायब तहसीलदार संदीप दावेराव, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार संजय चिंगलवार, सहायक गटविकास अधिकारी अनिल रामटेके, राम कांबळे, सरपंच अमोल कन्नाके व उपसरपंच आशिष कुचेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांच्या महसुली अडचणींचे निराकरण करण्यात आले. विशेषतः ७/१२ व ८-अ उताऱ्यांतील दुरुस्ती, फेरफार प्रकरणे, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी, तुकडाबंदी प्रकरणे अशा सेवांचा लाभ देण्यात आला. तसेच घरकुलासाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज निकाली काढणे तसेच प्रादेशिक परिवहन विभागाशी संबंधित अडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर चवणे व उपकृषी अधिकारी रीना भागवत यांनी अनुदान वाटप, पीएम किसान योजनेतील समस्यांचे निराकरण तसेच शेतपीक नुकसान भरपाईबाबत मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे शाखा अभियंता आर. डी. किटे यांनी ग्राहकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण केले. आरोग्य विभागाकडून सहयोग आरोग्य अधिकारी भावना गणवीर व वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल राठोड यांनी एनसीडी कॅम्प, सिकलसेल रक्त तपासणी शिबिर तसेच आयुष्मान भारत कार्ड वितरणाचे उपक्रम राबविले.
भूमी अभिलेख विभागामार्फत जिल्हा अधीक्षक वर्षा सूर्यवंशी व शिरस्तेदार सुनील बन यांनी पांदण रस्ते मोजणीसंदर्भात मौदा, सावंगी (मेघे), पार्वती, शालू व हिरापूर येथे नोटीस देऊन मोजणी अर्ज व फेरफार प्रकरणे निकाली काढली.
वन विभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एस. भलावी व क्षेत्र सहाय्यक ए. एल. जाधव यांनी नागरिकांच्या अडचणींचे निराकरण केले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची जनजागृती करण्यात आली. तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाचे विक्रम काटकपुरे यांनी परिवहन विभागाच्या विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या.
शिबिरात विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी व अर्ज स्वीकारून त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून विविध सेवांचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संदीप पुंडेकर यांनी केले. संचालन नायब तहसीलदार उदय धर्माधिकारी व संजीव वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन तलाठी नरवाडे यांनी मानले.
महसूल प्रशासनाच्या वतीने परिसरातील नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या वेळी सालोड व परिसरातील शेतकरी, नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.