टाईमझोन टू नॉलेजझोन” उपक्रम ठरला जिल्ह्यात अव्वल

Fri 27-Mar-2026,03:42 AM IST -07:00
Beach Activities

“टाईमझोन टू नॉलेजझोन” उपक्रम ठरला जिल्ह्यात अव्वल

प्रतिनिधि निखिल ठाकरे 

हिंगणघाट  : शिक्षण अधिक प्रभावी, सुलभ आणि अनुभवाधारित करण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२५-२६ मध्ये हिंगणघाट तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा शेकापूर (बाई) येथील शिक्षिका दिपाली सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेचा उद्देश शिक्षण क्षेत्रात नवकल्पना व प्रयोगशील उपक्रमांना प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत सकारात्मक बदल घडवणे हा आहे. विविध टप्प्यांवर तज्ज्ञांकडून सखोल मूल्यमापन करून उत्कृष्ट उपक्रमांची निवड करण्यात आली.

दिपाली सावंत यांनी सादर केलेला “टाईमझोन टू नॉलेजझोन” हा नवोपक्रम विद्यार्थ्यांना वेळेची संकल्पना सोप्या व रोचक पद्धतीने समजावून देणारा ठरला. पृथ्वीचे फिरणे, दिवस-रात्र आणि विविध देशांतील वेळेतील फरक यांचे स्पष्ट आकलन या उपक्रमातून विद्यार्थ्यांना होते.

शाळेच्या भिंतींवर लावलेल्या घड्याळांच्या साहाय्याने भारतासह विविध देशांच्या वेळेची तुलना विद्यार्थ्यांना करता येते. तसेच पृथ्वी-सूर्य प्रयोग, नकाशांचा वापर आणि वेळेवरील गणिती क्रियांद्वारे विज्ञान, गणित व भूगोल या विषयांचे एकत्रित शिक्षण प्रभावीपणे दिले जाते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि समज वाढीस लागली असून शिक्षण अधिक आनंददायी व सहभागात्मक बनले आहे. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग ही या उपक्रमाची जमेची बाजू ठरली आहे.

स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, निसर्ग सेवा समिती (ऑक्सिजन पार्क) अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. उर्मिला हाडेकर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डायट येथे करण्यात आला.

यापूर्वीही दिपाली सावंत यांच्या शोधनिबंधाला राज्यस्तरीय स्पर्धेत विभागात प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची ही आणखी एक यशस्वी नोंद ठरली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे शैक्षणिक व सामाजिक स्तरावरून कौतुक होत असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली नाविन्यपूर्ण दिशा भविष्यात अधिक व्यापक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.