हनुमान जयंतीच्या दिवशी जखमी माकडाला जीवनदान जीवरक्षक फाउंडेशनचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य
हनुमान जयंतीच्या दिवशी जखमी माकडाला जीवनदान
जीवरक्षक फाउंडेशनचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य
हिंगणघाट (प्रतिनिधी – निखिल ठाकरे) : शहरातील संत तुकडोजी वॉर्ड परिसरात हनुमान जयंतीच्या दिवशी एक माकड जखमी अवस्थेत आढळून आले. जखमी प्राण्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या जीवरक्षक फाउंडेशनला स्थानिक सजग नागरिकांनी तात्काळ याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच जीवरक्षक फाउंडेशनची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी अत्यंत दक्षता आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने जखमी माकडाचे सुरक्षित रेस्क्यू केले.
भारतीय संस्कृतीत माकडाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. माकड हे भगवान हनुमान यांचे प्रतीक मानले जाते. रामायणात हनुमानजींनी वानररूपात प्रभू श्रीरामांची सेवा केली असल्यामुळे त्यांना शक्ती, भक्ती आणि सेवाभावाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे माकडांचे रक्षण करणे हेही एक प्रकारे सेवाभावाचे कार्य समजले जाते.
यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने जखमी माकडावर आवश्यक उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर पुढील देखभालीसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
या संपूर्ण घटनेत जीवरक्षक फाउंडेशनच्या तत्परतेमुळे आणि नागरिकांच्या जागरूकतेमुळे एका मुक्या जीवाला नवजीवन मिळाले. या कार्यात वन्यजीव रक्षक राकेश झाडे, ओम चाफले, विराज कुंभारे, नयन वैद्य, भाविक कोपरकर तसेच वन कर्मचारी योगेश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.