आमदार राजेश बकाने यांच्या प्रयत्नांना यश

Sat 04-Apr-2026,03:18 AM IST -07:00
Beach Activities

आमदार राजेश बकाने यांच्या प्रयत्नांना यश

पुलगाव रेल्वे उड्डाणपुलासाठी ९८१.३९ लाखांची मंजुरी; कामाला मिळणार गती

देवळी/पुलगाव | प्रतिनिधी : युसुफ पठाण

देवळी/पुलगाव : परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या पुलगाव रेल्वे उड्डाणपुल (ROB) बांधकामाला अखेर मोठा दिलासा मिळाला असून आमदार राजेश बकाने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत महारेलच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी ९८१.३९ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या कामाला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पुलगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रेल्वे फाटकामुळे वारंवार होणारा अडथळा आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता या उड्डाणपुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मात्र कामाची गती मंदावल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. आता निधी मंजूर झाल्याने कामाला वेग येऊन ते लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

आमदार राजेश बकाने यांनी या प्रश्नाला प्राधान्य देत विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागांसोबत बैठका, पत्रव्यवहार तसेच निधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच ही मंजुरी शक्य झाली आहे.

या निधीमुळे पुलगाव येथील एल.सी. क्रमांक ८० वरील अप्रोच रस्ता तसेच संपूर्ण रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेगाने पूर्ण करता येणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडीत मोठी घट होऊन नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

याबाबत आमदार राजेश बकाने यांनी सांगितले की, “पुलगावकरांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा निधी मंजूर झाला आहे. आता प्रशासनाने काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करावे, अशी अपेक्षा आहे.”

या निर्णयामुळे पुलगाव परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून लवकरच कामाला वेग मिळून मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.