गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २ किलोहून अधिक गांजा जप्त; आरोपी रंगेहात अटक
गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई,२ किलोहून अधिक गांजा जप्त; आरोपी रंगेहात अटक
वर्धा | विशेष प्रतिनिधी – युसूफ पठाण
वर्धा जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कडक निर्देश दिले असून, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची टीम सतर्कपणे कारवाई करत आहे. १८ एप्रिल २०२६ रोजी हिंगणघाट उपविभागात पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस स्टेशन समुद्रपूर अंतर्गत मौजा कोरी (ता. समुद्रपूर) येथे छापा टाकण्यात आला.
या छाप्यात कमलाकर चिंतामन वावधणे यास त्याच्या राहत्या घरातून गांजा विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले. पंचनामा करून आरोपीच्या ताब्यातून २ किलो १५१ ग्रॅम गांजा, गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पॅशन प्रो मोटारसायकल (MH 32 AM 1627), मोबाईल फोन असा एकूण १,३४,७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात आरोपीसह गांजाचा पुरवठा करणारा शेख अलीम शेख रमजान (रा. आदर्श नगर, मोठा ताजबागजवळ, नागपूर) याच्याविरुद्धही एनडीपीएस कायद्यानुसार पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते तसेच कर्मचारी अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, दिनेश बोथकर आणि अभिषेक नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काळातही अशाच कडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.