वर्ध्याची चिमुकली ‘जलपरी’ मधुरा सायंकारचा विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धेत दमदार विजय
वर्ध्याची चिमुकली ‘जलपरी’ मधुरा सायंकारचा विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धेत दमदार विजय
वर्धा | प्रतिनिधी (युसूफ पठाण)
अमरावती, दि. ३० एप्रिल २०२६ : स्व. अनंत पंजाबराव देशमुख मेमोरियल स्विमिंग सेंटर, अमरावती तसेच श्री शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धा २०२६ मध्ये वर्धा जिल्ह्याची चिमुकली जलतरणपटू कु. मधुरा भारत सायंकार हिने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांतील जलतरणपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये मधुरा सायंकार हिने दमदार प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले.
तिने ५० मीटर फ्रीस्टाईल गटात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ५० मीटर अंडर-१० मुलींच्या बटरफ्लाय गटातही प्रथम क्रमांक मिळवला. याशिवाय ५० मीटर अंडर-१० मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक प्राप्त करून आपली कर्तबगारी सिद्ध केली.
तिच्या या यशाबद्दल स्व. अनंत पंजाबराव देशमुख मेमोरियल स्विमिंग सेंटरचे सचिव तथा श्री शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष व स्विमिंग सेंटरचे अध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांच्या हस्ते पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला.
मधुराने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षकवृंद आणि प्रशिक्षकांना दिले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून जलतरण क्षेत्रात तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.