अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण उघड; आरोपीला अटक, मुलगी सुखरूप पालकांच्या ताब्यात

Wed 06-May-2026,10:37 PM IST -07:00
Beach Activities

अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण उघड; आरोपीला अटक, मुलगी सुखरूप पालकांच्या ताब्यात

 

प्रतिनिधि इरशाद शाह दहेगाव 

वर्धा : दहेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने तपास करून उलगडा केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. तसेच पीडित १७ वर्षीय मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादीने दहेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्यांची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी हिला एका अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. या तक्रारीवरून दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस स्टेशन दहेगाव येथे अप. क्र. ३०२/२०२५ अन्वये कलम १३७(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पीडित मुलगी व आरोपी यांचा शोध लागत नसल्याने गुन्ह्यात कलम १३४(४) बीएनएसची वाढ करण्यात आली व पुढील तपासासाठी हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या विशेष सूचनेनुसार व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी व पीडित मुलगी यांचा शोध सुरू केला.

दरम्यान आरोपी व पीडित मुलगी हे हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून ट्रॅव्हल्सने वर्धेकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरात सापळा रचून आरोपी आकाश दिवाकर तडस (वय ३१, रा. घोराड ता. सेलू) यास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक करण्यात आली.

या कारवाईत अल्पवयीन पीडित मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली असून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास दहेगाव पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. सुभाष राऊत, अमर लाखे, चंद्रकांत बुरंगे, नितेश मेश्राम तसेच म.पो.हवा. शबाना शेख व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने केली.