सिंदी रेल्वे पोलिसांची धडक कारवाई : ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
सिंदी रेल्वे पोलिसांची धडक कारवाई : ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा : सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध गावठी दारू निर्मितीवर मोठी कारवाई करत तब्बल ४ लाख २५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा बोर नदी परिसरातील जेजुरी शिवार तसेच हिवरा साखरा शिवार येथे छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी दामिनी फुलमाळी रा. जेजुरी आणि राजू पवार रा. हिवरा हे अवैधरित्या गावठी मोहाची दारू तयार करताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून कच्चे मोह रसायन, सडवा व दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत सिंदी रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मेकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नरेंद्र निवसाने यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. ज्ञानोबा पळनाटे, नापोशि पंकज घोडे, कांचन चाफले, समीर आगे, उमेश खामणकर, अमोल कोडपे व गणेश वाघ यांनी केली.