वाहतूक पोलीस अंमलदारांना सुरक्षेसाठी बॉडी वॉर्न कॅमेरे

Wed 13-May-2026,04:19 AM IST -07:00
Beach Activities

वाहतूक पोलीस अंमलदारांना सुरक्षेसाठी बॉडी वॉर्न कॅमेरे

वर्धा | युसूफ पठाण

वर्धा शहर व जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलीस अंमलदारांना बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या पुढाकारातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अति वेगाने वाहन चालविणारे तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचे फोटो, ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग या बॉडी वॉर्न कॅमेराद्वारे करण्यात येणार असून, चलन कारवाईदरम्यान हे महत्त्वाचे पुरावे ठरणार आहेत.

वाहतूक ड्युटीवर असलेले अंमलदार हे कॅमेरे गणवेशावर लावून काम करणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमभंग, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे तसेच कारवाईदरम्यान होणारे वाद-विवाद यांचेही चित्रीकरण होणार आहे. यामुळे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेलाही मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

या शासकीय बॉडी वॉर्न कॅमेरामधील फोटो, ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये कोणालाही एडिटिंग किंवा डिलीट करता येणार नसल्याने पारदर्शकता कायम राहणार आहे. तसेच वाहतूक अंमलदारांनी केलेली कारवाई योग्य पुराव्यांसह झाली आहे की नाही, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही लक्ष राहणार आहे.

या उपक्रमामुळे वाहन चालकांनाही न्याय मिळण्यास मदत होणार असून, वर्धा जिल्ह्यातील सर्व वाहतूक अंमलदारांना हे बॉडी वॉर्न कॅमेरे वितरित करण्यात आले आहेत.

वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा व अपघात टाळण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालकांना करण्यात आले आहे.