सेवाग्राम येथील एमजीआयएमएसच्या रात्रीच्या सेवांवर प्रश्नचिन्ह

Tue 19-May-2026,11:30 PM IST -07:00
Beach Activities

सेवाग्राम येथील एमजीआयएमएसच्या रात्रीच्या सेवांवर प्रश्नचिन्ह

गंभीर रुग्ण व्हीलचेअरवर ताटकळत; डॉक्टर गैरहजर असल्याची चर्चा

सेवाग्राम | वर्धा तालुका प्रतिनिधी : इरशाद शहा

सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एमजीआयएमएस) रुग्णालयातील रात्रीच्या आरोग्य सेवांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मेडिसिन वॉर्ड क्रमांक ३३ मध्ये सोमवारी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास एक गंभीर रुग्ण व्हीलचेअरवर बराच वेळ उपचारांच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र संबंधित डॉक्टर त्या वेळी उपस्थित नसल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळेस आपत्कालीन परिस्थितीतील रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होत असतात. अशा वेळी तत्काळ वैद्यकीय सेवा मिळणे अपेक्षित असताना काही डॉक्टर ड्युटीदरम्यान अनुपस्थित असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयातील रात्रीच्या सेवांबाबत यापूर्वीही अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा दिसून येत नसल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेऊन रुग्णालय प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीच्या सेवांमधील हलगर्जीपणा थांबवावा तसेच रुग्णांना तात्काळ उपचार मिळतील यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.