हमदापुर येथे ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा; जुगार व अवैध दारू व्यवसाय उघड, ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Wed 27-May-2026,05:28 AM IST -07:00
Beach Activities

हमदापुर येथे ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा; जुगार व अवैध दारू व्यवसाय उघड, ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

वर्धा तालुका प्रतिनिधी – इरशाद शहा

वर्धा : पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी अंतर्गत मौजा हमदापुर येथे सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून जुगार अड्डा व अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत ९२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ मे २०२६ रोजी दहेगाव (गोसावी) पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, हमदापुर बसस्टॉप परिसरातील “शंकर ऑनलाईन लॉटरी सेंटर” येथे जुगार व अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी अर्सालन उर्फ सोनु अश्नुर शहा (वय २२, रा. सिंदी रेल्वे) व शंकर गेंदलाल अमनेरकर (वय ३४, रा. हमदापुर) हे संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन जुगार चालविताना रंगेहात आढळून आले.

पोलिसांनी तपासणी केली असता एका संगणकावर “राजश्री” तर दुसऱ्या संगणकावर “गोल्डन चॉन्स” नावाचा जुगार खेळ सुरू असल्याचे दिसून आले. तसेच घटनास्थळी देशी व विदेशी दारूचा साठाही आढळून आला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन संगणक, सीपीयू, प्रिंटर, स्कॅनर, इंटरनेट डोंगल, की-बोर्ड, माउस, प्रिंटर रोल, नगदी रक्कम तसेच देशी-विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण ९२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी आरोपी प्रफुल मेश्राम (मूळ मालक) व विक्की नारायण विचोरे यांच्यासह एकूण चार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा, महाराष्ट्र दारूबंदी कायदा व भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक यशवंत कदम यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार आनंद भरणे, ब्रम्हानंद गुन, गजानन वाठ तसेच पोलिस अंमलदार अनिल मिलगर, रुस्तम मुंगल व भारत सातपुते यांनी केली.