वर्धा पोलिसांची ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ विरोधात मोठी कारवाई; बजाज चौकात दोन चालकांवर गुन्हे दाखल

Fri 29-May-2026,01:20 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा पोलिसांची ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ विरोधात मोठी कारवाई; बजाज चौकात दोन चालकांवर गुन्हे दाखल

वर्धा | जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी वर्धा पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून जिल्हाभरात “विशेष सुरक्षा अभियान” राबविण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मोकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या अभियानांतर्गत बजाज चौक परिसरात गस्तीदरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार मुकेश राऊत (बकल नं. 1265) व पोलीस शिपाई दिलीप कामडी (बकल नं. 163) यांनी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या दोन चालकांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.

कारवाई करण्यात आलेले चालक :

1) किशोर रामकृष्ण वधाई (वय 50, रा. इंदिरा नगर, वर्धा)

हे बजाज चौक परिसरात अत्यंत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना आढळून आले. तपासणीदरम्यान त्यांच्या रक्तात 300.9 mg% अल्कोहोल आढळले. तसेच त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचेही निदर्शनास आले. त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 तसेच 3(1)/177 अंतर्गत कारवाई करण्यात आली.

2) स्वप्निल विनोद मानकर (वय 17, रा. वर्धा)

अल्पवयीन असतानाही मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आले. तपासणीमध्ये त्यांच्या रक्तात 122.6 mg% अल्कोहोल आढळले. त्यांच्याविरुद्ध कलम 185 तसेच 4(1)/181/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अपघात टाळण्यासाठी सुरू असलेली तपासणी मोहीम आता दररोज राबविण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट लावावा, वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणे टाळावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.