वर्धा शहरात पोलिसांचे मोठे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’; गुन्हेगारांमध्ये खळबळ, अनेक सराईत आरोपी पोलिसांच्या रडारवर
वर्धा शहरात पोलिसांचे मोठे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’; गुन्हेगारांमध्ये खळबळ, अनेक सराईत आरोपी पोलिसांच्या रडारवर
वर्धा | प्रतिनिधी युसूफ पठाण
वर्धा शहर पोलिसांनी राबविलेल्या विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ (घेराबंदी व शोधमोहीम) मुळे गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या आक्रमक कारवाईनंतर शहरातील अनेक सराईत व सवयीचे गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आले असून समाजकंटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही कारवाई वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण (क्राईम डिटेक्शन) पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
या मोहिमेअंतर्गत शहर व परिसरातील अवैध धंदे करणारे, शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणारे तसेच मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत आरोपींची तपासणी करण्यात आली. संबंधित आरोपींना पोलीस ठाण्यात आणून त्यांची सखोल चौकशी करण्यात आली तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. भविष्यात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यात सहभागी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये धास्ती निर्माण झाली असून समाजकंटकांवर पोलिसांचा चांगलाच वचक निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही. संघटित गुन्हेगारी करणारे, परिसरात दहशत निर्माण करणारे, नोंदणीकृत आरोपी तसेच कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांविरोधात ही मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे.
कारवाईचा तपशील
संघटित व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांवरील कारवाई
वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी तसेच शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या ८ आरोपींवर कारवाई करण्यात आली.
मालमत्तेविरुद्ध गुन्हे
चोरी, घरफोडी व लुटमारीसारख्या मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या १० आरोपींना कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या.
अवैध शस्त्रधारकांवर पोलिसांचा शिकंजा
अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या १२७ नोंदणीकृत गुन्हेगारांच्या घरांची तपासणी करण्यात आली. अवैध शस्त्रास्त्रांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत शस्त्रास्त्र कायद्यान्वये कारवाई सुरू आहे.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध शस्त्रे बाळगणारे अनेक आरोपी शहर सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मकोका अंतर्गत कठोर कारवाई
चालू वर्षात संघटित गुन्हेगारीत सहभागी असलेल्या एकूण ८ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली असून त्यांना कारागृहात पाठविण्यात आले आहे.
पोलिसांच्या या सर्वंकष कारवाईमुळे शहरात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारांचे मनोबल खच्ची झाले आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगत, कोणतीही गुन्हेगारी घटना, संशयास्पद हालचाल किंवा समाजविघातक कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संतोष ताले, पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले.