नीट पेपरफुटी व महागाईविरोधात वर्ध्यात युवक काँग्रेसचे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर
नीट पेपरफुटी व महागाईविरोधात वर्ध्यात युवक काँग्रेसचे आंदोलन
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर
वर्धा | प्रतिनिधी युसूफ पठाण
वर्धा | दि. २ जून २०२६ देशातील नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरण तसेच बियाणे, रासायनिक खते, पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांविरोधात वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी भव्य आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले.
आंदोलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. त्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात निषेधाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच वाढती महागाई आटोक्यात आणण्याची मागणी केली.
महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केल्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव राहुल सुरकर, देवळी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विपुल तडाम, वर्धा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल उघडे, जिल्हा महासचिव शुभम आरगुडे, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमित देशमुख, युवक काँग्रेस उपाध्यक्ष अमित चाफले, देवळी विधानसभा उपाध्यक्ष जय जगताप यांच्यासह युवक काँग्रेसचे अनेक आजी-माजी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
निवेदन सादर केल्यानंतर आंदोलन शांततेत पार पडले. नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांवरील बियाणे व खतांच्या दरवाढीचा भार कमी करावा, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.