दारूच्या नशेत ऑटो चालविणाऱ्या चालकावर वाहतूक पोलिसांची कारवाई
दारूच्या नशेत ऑटो चालविणाऱ्या चालकावर वाहतूक पोलिसांची कारवाई
अपघात रोखण्यासाठी जिल्हाभर विशेष मोहीम; मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी जिल्हा वाहतूक पोलीस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान दि. ३ जून २०२६ रोजी बजाज चौक, वर्धा येथे वाहतूक पोलिसांनी तपासणी केली.
यावेळी ड्युटीवर असलेले सफौ. रियाज खान, पोहवा. किशोर पाटील आणि पोशी. दिलीप कामडी यांनी एमएच-३२-एस-४९१७ क्रमांकाच्या ऑटोची तपासणी केली. ऑटो चालक श्रावण ताराचंद शंभरकर (वय ४२, रा. बोधुडा, ता. जि. वर्धा) हा दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे आढळून आले. तसेच तो ऑटो रस्त्याच्या मधोमध आणि धोकादायक पद्धतीने चालवत असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर संबंधित चालकास वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथे आणून ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये त्याच्या शरीरात २२९.८ मिलीग्रॅम टक्के अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले.
या प्रकरणी संबंधित ऑटो चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेच्या माहितीनुसार, सन २०२६ मध्ये वर्धा जिल्ह्यात मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या एकूण १४८ कारवाया करण्यात आल्या आहेत.
वाहन चालकांनी स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षेचा विचार करून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.