रामनगरच्या नव्या ठाणेदार पीआय राखोंडे यांची धडाकेबाज कारवाई; अवैध दारूविक्रेत्यांवर मोठा प्रहार
रामनगरच्या नव्या ठाणेदार पीआय राखोंडे यांची धडाकेबाज कारवाई; अवैध दारूविक्रेत्यांवर मोठा प्रहार
वर्धा, प्रतिनिधी / युसूफ पठाण : रामनगर पोलीस ठाण्याच्या नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक (पीआय) राखोंडे यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत असून, दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तिघा आरोपींना अटक करून एकूण २७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
५ जून २०२६ रोजी दारूबंदी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रामनगर परिसरातील पोद्दार बगीचा येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत राजू स्वामीनारायण जयस्वाल (वय ५४) व विकास सुधीर खोब्रागडे (वय ३६) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून देशी-विदेशी दारू तसेच बिअरचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५४१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.
त्यानंतर ६ जून २०२६ रोजी रामनगर पोलीस हद्दीत विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान इंदिरानगर परिसरात शुभम दरोकार (रा. आदिवासी कॉलनी, इंदिरानगर, वर्धा) याच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान देशी-विदेशी दारू व बिअरचा ७ हजार ७०० रुपयांचा साठा आढळून आला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अपराध क्रमांक ५४५/२०२६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक वर्धा व अपर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राखोंडे यांच्या नेतृत्वात पार पडली. दारूबंदी पथकातील पोलीस हवालदार अवी बनसोड, मुकेश वांदिले, मनोज भोमले आणि विक्की अनेराव यांनी कारवाई यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात पीआय राखोंडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे या कारवायांवरून स्पष्ट होत असून, अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस विभागाकडून मिळत आहेत.