बसस्थानक परिसरात खाजगी वाहनांवर कारवाई; ४६ हजारांचा दंड वसूल

Sun 07-Jun-2026,04:48 AM IST -07:00
Beach Activities

बसस्थानक परिसरात खाजगी वाहनांवर कारवाई; ४६ हजारांचा दंड वसूल

वर्धा, प्रतिनिधी / इरशाद शाह : वर्धा शहर व जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वाहतुकीवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत कारवाईचा बडगा उगारला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखेला देण्यात आले आहेत.

याशिवाय बसस्थानकाच्या प्रवेशद्वार व निर्गमनद्वारावर दररोज दोन वाहतूक अंमलदार नियुक्त करण्यात आले असून वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

या मोहिमेअंतर्गत वाहतूक पोलिसांनी बसस्थानक परिसरातील २०० मीटर अंतराच्या आत उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स व इतर खाजगी वाहनांवर मोटार वाहन कायदा कलम १२२/१७७ अन्वये कारवाई केली. या कारवाईत ३८ लक्झरी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दरम्यान, लक्झरी बस चालकांची बैठक घेऊन त्यांना बसस्थानक परिसरात वाहने उभी न करण्याबाबत तसेच अवैध प्रवासी वाहतूक टाळण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बसस्थानक परिसरात यासंदर्भातील सूचना फलकही लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने नागरिक व वाहनचालकांना करण्यात आले आहे.