महाराष्ट्र अंनिस वर्धा जिल्हा शाखेला राज्यस्तरीय ‘लक्षवेधी पुरस्कार’
महाराष्ट्र अंनिस वर्धा जिल्हा शाखेला राज्यस्तरीय ‘लक्षवेधी पुरस्कार’
वर्धा, प्रतिनिधी : युसूफ पठाण
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अहिल्यानगर येथे ५, ६ व ७ जून रोजी आयोजित विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत वर्धा जिल्हा शाखेला उत्कृष्ट सामाजिक कार्य व विविध जनजागृती उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल राज्यस्तरीय ‘लक्षवेधी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, असंघटित कामगारांचे नेते तसेच एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, पुणेचे अध्यक्ष डॉ. सुभाष लोमटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व संविधान अभ्यासक प्रा. सुभाष वारे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष प्रा. संजय बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व सन्मानपत्र राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, व्यसन व संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह सारिका डेहनकर, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह प्रकाश कांबळे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मासिकाच्या जिल्हा कार्यवाह रजनी सुरकार, वर्धा शहर शाखेच्या प्रधान सचिव कल्पना सातव-फुसाटे तसेच उपाध्यक्ष अशोक हेडावू यांनी संयुक्तपणे स्वीकारले.
विदर्भातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पहिली शाखा १३ सप्टेंबर २००२ रोजी वर्धा येथे स्थापन झाली. स्थापनेपासून समितीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन व निर्माल्यदान मोहीम, व्यसनमुक्ती जनजागृती, ‘दारूचा नाही, दुधाचा’ अभियान, ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ उपक्रम, फटाकेमुक्त दिवाळी प्रबोधन, सर्पदंश व सर्पमित्र जनजागृती, बुवाबाबांचा भंडाफोड, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, शिक्षक प्रशिक्षण तसेच चमत्कारांचे वैज्ञानिक सादरीकरण यांसारखे विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविले आहेत.
समितीच्या या सातत्यपूर्ण आणि प्रभावी सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वर्धा जिल्हा शाखेला राज्यस्तरीय ‘लक्षवेधी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल सामाजिक, शैक्षणिक व स्वयंसेवी क्षेत्रातील विविध मान्यवर, संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वर्धा जिल्हा शाखेचे अभिनंदन केले आहे.