सेवानिवृत्त व दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या समस्यांवर विशेष बैठक; प्रलंबित देयके तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश

Fri 12-Jun-2026,09:56 PM IST -07:00
Beach Activities

सेवानिवृत्त व दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या समस्यांवर विशेष बैठक; प्रलंबित देयके तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सेवाकाळात दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या प्रलंबित पेंशन व आर्थिक विषयांवरील अडचणींच्या निवारणासाठी शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल होते.

यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी आणि दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. पेंशन, जीपीएफ देयके, रजा रोखीकरण, पदोन्नतीशी संबंधित थकीत रक्कम तसेच इतर प्रलंबित प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. कोणत्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला किंवा दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या हक्काच्या लाभांसाठी वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागू नयेत, याची विशेष काळजी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

मानव संसाधन (कल्याण) शाखा तसेच लेखा विभागाला निश्चित कालमर्यादेत प्रलंबित देयके अदा करण्यासह प्रशासकीय त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती आणि इतर थकीत लाभांबाबत उद्भवणाऱ्या अडचणींना प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासनही बैठकीत देण्यात आले.

या उपक्रमाबद्दल उपस्थित सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानत संवेदनशील आणि सकारात्मक पाऊल असल्याची भावना व्यक्त केली.

सेवानिवृत्त कर्मचारी व दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद मानला जात आहे.