जिल्हास्तरीय आढावा बैठक व पल्स पोलिओ मोहिमेवरील कार्यशाळा संपन्न
जिल्हास्तरीय आढावा बैठक व पल्स पोलिओ मोहिमेवरील कार्यशाळा संपन्न
२८ जून रोजीच्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज
प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा
वर्धा, दि. १७ : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात जिल्हास्तरीय आढावा बैठक तसेच २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेबाबत कार्यशाळा पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा समन्वयक अधिकारी तथा आरोग्य सेवा खरेदी कक्षाचे उपसंचालक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी मंगेश रेवतकर, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पवार, जिल्हा प्रशिक्षण पथकाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा खोब्रागडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदीप नखाते, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनित झळके, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी आम्रपाली मोरे, स्मिता वासनिक, सोनू हाडके आदी उपस्थित होते.
२८ जून रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पराग सोमण यांनी दिल्या. तसेच ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ बुथवर नेऊन पोलिओचे डोस देण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले.
डॉ. सचिन तडस यांनी शहरी आरोग्य सुविधांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रभावी समन्वय, नियमित माहिती अद्ययावत ठेवणे आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. तसेच विविध प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये माता व बालकांचे लसीकरण, बाह्यरुग्ण सेवा, क्षयरोग, मलेरिया, कुष्ठरोग, मानसिक आरोग्य, मुख आरोग्य, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, जननी-शिशु सुरक्षा कार्यक्रम, नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रम, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम, राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा आदी योजनांचा समावेश होता.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, विविध कार्यक्रमांचे समन्वयक तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी दिली.