टाकळी–दहेगाव पांदण रस्त्याच्या पक्कीकरणाची मागणी; आमदार संजय देरकर यांना निवेदन

Thu 18-Jun-2026,05:58 AM IST -07:00
Beach Activities

टाकळी–दहेगाव पांदण रस्त्याच्या पक्कीकरणाची मागणी; आमदार संजय देरकर यांना निवेदन

खराब रस्त्यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त; निधी उपलब्ध होताच काम सुरू करण्याचे आश्वासन

वर्धा | शहर प्रतिनिधी : अमन नारायणे

मारेगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या टाकळी गावातील नागरिकांना अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. टाकळी–दहेगाव या महत्त्वाच्या पांदण रस्त्याच्या पक्कीकरणासाठी गावातील युवक रोहन राजू आदेवार यांनी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

टाकळी गाव हे भौगोलिकदृष्ट्या तालुक्याच्या सीमेवर असल्याने नागरिकांना विविध मूलभूत सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. शेजारील राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. तसेच अनेक शेतकऱ्यांची शेतशिवारही याच मार्गावर असल्याने हा रस्ता त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. दुचाकी, चारचाकी वाहने तसेच शेतीमाल वाहून नेणाऱ्या वाहनांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात नेणेही कठीण बनत असल्याची समस्या नागरिकांनी मांडली आहे.

या पार्श्वभूमीवर रोहन राजू आदेवार यांनी आमदार संजय देरकर यांच्याकडे रस्त्याच्या पक्कीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. निवेदनातील मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार देरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

संबंधित योजनेअंतर्गत निधी उपलब्ध होताच टाकळी–दहेगाव पांदण रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येईल, असे आश्वासन आमदार संजय देरकर यांनी दिले. त्यांच्या या आश्वासनामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.